Coronavirus: दिल्लीत एकाच कुटुंबातील तब्बल 31 जण कोरोनाबाधित, परिसरात खळबळ
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने दिवसागणिक त्याच्या रुग्णासह मृतांच्या आकड्यात भर पडत आहेत. त्यामुळे येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय देण्यात आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. पण आता दिल्लीत एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून त्या सर्वांना नरेला येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्वजण एका कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जहांगीरपुर येथील सी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून या महिलेची कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमूने पाठवले होते. मात्र चाचणीचे रिपोर्ट्स येण्यापूर्वी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर 6 एप्रिलला महिलेवर अंतिमसंस्कार करण्यात आल्यानंतर जवळजवळ 15 जणांना क्वारंटाइन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. तसेच परिसर सुद्धा सील करण्यात आला होता. त्याचसोबत येथील स्थानिक नागरिकांचे नमून घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामधील 31 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.(Coronavirus Outbreak In India: कोरोना रुग्णांची संख्या 15,712 वर; 507 जणांचा मृत्यू, 2231 जणांना डिस्चार्ज)

 दरम्यान, दिल्लीतील कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे आदेश येत्या 27 एप्रिल शिथिल करणार नसल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. तर दिल्ली मध्ये एकूण 1893 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आता पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 15 हजारांवर पोहचला आहे. तर 507 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.