राफेल डील: राहुल गांधींच्या आरोपाला निर्मला सितारामण यांचे फ्रान्समधून उत्तर
संरक्षणमंत्री निर्मला सितारामण (File Photo, Credit-ANI )

केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारने फ्रान्स सोबत केलेला राफेल करार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिवसेंदिवस राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद विस्तारीत रुप धारण करत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमिवर संरक्षणमंत्री निर्मला सितारामण फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. राफेल प्रकरणात या दौऱ्यावरुनही काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्य पत्रकार परिषदेत सरकारला लक्ष्य केले. राहुल यांनी सितारामण या आताच आणि त्याही इतक्या तातडीने फ्रान्स दौऱ्यावर का गेल्या?, असा प्रश्न विचारत 'राफेल प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच त्या फ्रान्सला गेल्या'चा आरोप केला होता. दरम्यान, या प्रश्नाला विदेश दौऱ्यावर असलेल्या सितारामण यांनी फ्रान्समधून उत्तर दिले आहे. तसेच, त्यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशीही संवाद साधला आहे.

निर्मला सितारामण यांनी पॅरीसमध्ये संक्षिप्त निवेदन केले. सितारामण यांनी डसॉल्ट ही कंपनी भागीदार म्हणून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची निवड करेल याची काहीच कल्पना सरकारला नव्हती, असा पुनरुच्चार केला. फ्रान्स सरकारसोबत आम्ही ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला आहे. हा दोन्ही देशांच्या सरकारांचा करार आहे आणि यात कोणत्याही व्यक्तिगत, किंवा खासगी कंपनीचा हात नाही, असेही सितारामण यांनी सांगितले.

पुढे बोलतान सितारामण म्हणाल्या, राफेल करारावरुन भागिदार कंपनीबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्याची जबाबदारी ही निवड केलेल्या कंपनीची आहे. म्हणजेच, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एव्हिएशनकडूनबाबत राफेल प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डसॉल्टने द्यावीत, असे सितारामण यांनी सूचवले आहे.

दरम्यान, फ्रान्समधील मीडिया पार्ट नावाच्या एका शोधपत्रकारिता करणाऱ्या संकेतस्थळाने आपल्या वृत्तात दावा केला आहे की, राफेल डीलसाठी रिलायन्ससोबत भागिदारी करणे डसॉल्ट कंपनीला   'बंधनकारक' होते. याच पार्श्वभूमिवर रिलायन्सची निवड करण्यात आली.. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, डसॉल्टने पुन्हा एकदा दावा केला आहे की, रिलायन्सची निवड आपण स्वत:च केली आहे.