राफेलमुळे देशातील वातावरण चांगलेच तापले असताना, फ्रेंच मिडीयाने त्यात तेल ओतण्याचे काम केले आहे. फ्रांसच्या मिडियापार्ट या वृत्तपत्राने, ‘डसॉल्ट एव्हिएशन आणि भारत यांमध्ये 2017 साली झालेल्या बैठकीमधील करारात, रिलायन्सची निवड करणे ही अट होती’ असा गौप्यस्फोट केला आहे.
मिडियापार्ट या वृत्तपत्राने डसॉल्ट आणि भारत यांमध्ये झालेल्या कराराची अंतर्गत कागदपत्रे मिळवली आहेत. कंपनीच्या डेप्यूटी सीईओंनी 2017 मध्ये डसॉल्ट-रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडच्या बैठकीत म्हटले होते की, डसॉल्ट एव्हिएशनला भारतासोबत हा करार व्हावा यासाठी सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक होते, आणि रिलायन्सची निवड हा या करारामधीलच एक अनिवार्य भाग होता. म्हणजेच डसॉल्टला जर हा प्रकल्प करायचा असेल तर त्यांना रिलायन्सशी भागीदारी करणे बंधनकारक असेल.
सध्या देशामध्ये ‘राफेल विमान प्रकरणा’चा वाद सुरु आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी काही दिवसांपूर्वी भारताने रिलायन्सचे नाव सुचवल्याचे सांगितले होते. त्यावर राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्सला ताराण्यासाठीच मुद्दाम भाजपाने रिलायन्सचे नाव पुढे केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर केंद्र सरकारने ‘डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीनेच रिलायन्सची निवड केली आहे’ असे स्पष्टीकरण देऊन या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता मिडियापार्टने दिलेल्या वृत्तामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
दरम्यान बुधवारी या खरेदीबाबत निर्णय प्रक्रियेचा तपशील लखोटाबंद पाकिटात सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारलाही आता तपशील सादर करावा लागेल.