Cyclone | Image Used For Representational Purpose (Photo Credits: Wikimedia Commons)

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आलं. त्याचा महाराष्ट्रासह आठ राज्यांना मोठा फटका बसला. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतून ही राज्ये अद्याप सावरली नाहीत तोच आणखी एका वादळाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. 'यास' (Cyclone Yaas) असे या नव्या चक्रीवादळाचे नाव असून ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोघावत असल्याचे संगेत आहे. बंगालच्या उपसारगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हे क्षेत्र अधिक प्रमाणात वाढल्यास येत्या 26 मे या दिवशी 'यास' चक्रीवादळ मोठ्या प्रमाणावर येऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, यास चक्रीवादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन केंद्र सरकारने आवश्यक त्या हलचाली सुरु केल्या आहेत. पूर्व किनारपट्टीवरील काही प्रमुख राज्यांना सतक्रतेचा इशाराही देण्यात आला आहे. गरज पडल्यास तातडीने पाचारण करण्यासाठी केंद्राने NDRF च्या तुकड्याही सज्ज ठेवल्या आहेत.

हवामान विभागाने म्हटले आहे की, 'यास' हे चक्रीवादळ 26 मे या दिवशी पश्चिम बंगाल अथवा ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर धडकेल. तत्पूर्वी केंद्र सरकारने पूर्व समुद्र किनारपट्टीवर असलेल्या पश्चिम बंगाल, ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू ही राज्ये आणि अंदमान-निकोबार या केंद्रशासीत प्रदेशाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या राज्यातील सचिवांना पत्र लिहून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या आणि आरोग्यविषयक यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो अशी कोविड सेंटर्स आणि इतरही रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षीत ठिकाणी हालवण्याच्या सूचनाही या पत्रात आहेत. (हेही वाचा, Cyclone Yaas: तौक्ते वादळानंतर आता 23-24 मे दरम्यान 'यास चक्रीवादळा'चा धोका; 'या' राज्यांना अलर्ट जारी )

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार यास चक्रीवादळ 26 मे या दिवशी पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. ही शक्यता म्हणजे संभाव्य इशारा असेच गृहित धरून एनडीआरएफ (National Disaster Response Force) आवश्यक खबरदारी घेत आहे. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळात मदत आणि बचावकार्यासाठी पाठवलेल्या तुकड्याही एनडीआरएफने परत बोलावल्या आहेत. आता या तुकड्या 'यास' चक्रिवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याच्या मोहीमवर जाणार असल्याचे वृत्त आहे. हवामान विभाग ज्या पद्धतीने सूचना देईल त्यानुसार या तुकड्या आवश्यक तेथे मदत पूरवणार आहेत.