
कोविड-19 (Covid-19) लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक समस्या उद्भवल्या असल्या तरी एक सकारात्मक बाब पुढे आली आहे. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पुणे गुन्हेगारी विभागाचे डिसीपी (Pune DCP) बच्चन सिंह (Bachchan Singh) यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये लॉकडाऊन दरम्यान गुन्हेगारीचे प्रमाण 6 पटीने कमी झाले. परंतु, महिलांवरील अत्याचार आणि संपत्तीवरुन होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढले आहे.
सध्या देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपत आला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल, असे हरियाणा DGP एक्स्पर्ट यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊननंतर वाढणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण हाताळण्यासाठी हरियाणा पोलिस चिफ मनोज यादव तयार आहेत. त्यामुळे ज्या दुकान, ऑटलेट्समध्ये रोकड अधिक प्रमाणात असेल अशा सर्व दुकानदारांना सतर्क करण्यात आले आहे.
तसंच लॉकडाऊननंतरही मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे मास्क घालून गुन्हे करण्यांचे प्रमाणही वाढणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी देखील दुकांनामध्ये प्रवेश करताना मास्क काढून ओळख पटवून मग कामाला सुरुवात करावी, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,65,799 वर पोहचला आहे. त्यापैकी 89987 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 71105 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संसर्गाने देशातील 4706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.