गोमूत्रातील (Cow Urine) औषधी गुणधर्मांवर देशात अनेकदा वाद झाला आहे. याबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. काहींनी गोमूत्र आरोग्यदायी असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी या दाव्याची खिल्ली उडवली. आता सोशल मीडियावर आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी (IIT Madras Director V Kamakoti) यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये ते गोमूत्राच्या 'औषधी गुणधर्मां'ची प्रशंसा करताना दिसत आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कामकोटी व्हिडिओमध्ये गोमूत्रातील 'अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि पाचक गुणधर्मांचे समर्थन करताना दिसत आहे. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या आजारांसाठी याचा उपयोग होतो असा दावाही त्यांनी केला आहे.
आयआयटी मद्रासचे संचालक मट्टू पोंगलच्या दिवशी (15 जानेवारी 2025) चेन्नईतील गो-संरक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गोमूत्राच्या 'औषधी गुणधर्मां'ची प्रशंसा केली. इथे त्यांनी एका साधूबद्दलचा किस्साही सांगितला, ज्याने त्याला खूप ताप असताना गोमूत्र सेवन केले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कामकोटी यांनी या गोष्टी सांगितल्याच्या वृत्ताला संस्थेतील सूत्रांनी दुजोरा दिला आहे व्ही. कामकोटी हे देशी गायींचे संरक्षण आणि सेंद्रिय शेती अवलंबण्याचे महत्त्व या विषयावर बोलत होते.
आयआयटी मद्रासच्या संचालकांनी नमूद केले गोमूत्राचे औषधी गुणधर्म-
மூளை வலிமை அதிகம் கொண்ட கும்பல் ஆட்சியில் ஐஐடி இயக்குநர் லட்சணத்தை பாருங்கள்.. கோமியம் காய்ச்சல் மருந்தாம்😅 pic.twitter.com/3StltuzStU
— Subathra Devi (@SubathraDevi_) January 18, 2025
सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि एकूणच अर्थव्यवस्थेत देशी जनावरांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणारी ही त्यांची टिप्पणी होती. दरम्यान, आयआयटी मद्रासच्या संचालकांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) च्या सदस्यांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते कार्ती पी चिदंबरम यांनी या वक्तव्याचा निषेध केला आणि आरोप केला की, आयआयटी मद्रासचे संचालक 'स्यूडोसायन्स'चा प्रचार करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनला टॅग करत त्यांनी लिहिले, 'आयआयटी मद्रासच्या संचालकांनी छद्म विज्ञानाला प्रोत्साहन देणे अत्यंत अयोग्य आहे.' (हेही वाचा: Hair Loss, Baldness vs. Alopecia: अलोपेसिया आणि केस गळणे, टक्कल पडणे यांमध्ये फरक काय? त्याचे प्रकार आणि उपचार यांबातब घ्या जाणून)
दुसरीकडे, द्रमुक नेते टीकेएस इलांगोवन यांनीही संचालकांच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्यांची संस्थेतून बदली करण्याची मागणी केली. द्रमुक नेत्याने वृत्तवाहिनी टाइम्स नाऊला सांगितले की, 'संचालकांची आयआयटीमधून बदली करून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करावी. ते आयआयटीमध्ये काय करत आहेत? कारण ही संस्था अभियांत्रिकी आणि इतर क्षेत्रांशी संबंधित आहे. त्यांना एम्समध्ये संचालक म्हणून नियुक्त केले पाहिजे. सरकारने त्यांना तातडीने आयआयटीमधून काढून एम्सच्या संचालकपदी नियुक्ती करावी.’ वाढता विवाद पाहता, कामकोटी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की ते गोशाळेच्या कार्यक्रमात बोलले, परंतु ते स्वतः एक 'सेंद्रिय शेतकरी' आहेत आणि त्यांच्या टिप्पण्या व्यापक संदर्भात होत्या.