COVID19: भारतात कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप कायम असून सरकारकडून वेळोवेळी त्याचा प्रादुर्भाव पसरु नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा ही भारतात शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीदरम्यान गेल्या सात महिन्यांमध्ये देशात कोरोना व्हायरसच्या संदर्भातील उपकरणांसह अन्य गोष्टींचा तब्बल 33 टन घनकरचा साठा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दिली गेली आहे.
सीपीसीबी यांनी जाहिर केलेल्या त्यांच्या कचऱ्यासंदर्भातील आकडेवारीच्या रिपोर्ट्समध्ये महाराष्ट्रात 3587 टन कचरा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर देशात ऑक्टोंबरच्या महिन्यातच जवळजवळ 5500 टन कोरोना व्हायरसमुळे कचऱ्याचा साठा निर्माण झाल्याची ही आकडेवारी यामधून समोर आली आहे. तसेच देशातील केरळ मध्ये 3300 टन, गुजरात येथे 3086, तमिळनाडू 2806 टन, उत्तर प्रदेशात 2502 टन, दिल्लीत 2471, पश्चिम बंगाल मध्ये 2095 टन आणि कर्नाटक 2026 टन कचऱ्याचा साठा झाल्याची माहिती सुद्धा सीपीसीबीच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. (COVID-19 Vaccination in India: 16 जानेवारी पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात; आरोग्यसेवक, कोरोना योद्धांना प्राधान्य)
तर भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 16311 रुग्ण आढळून आले आहेत. तर 19299 जणांना डिस्चार्ज दिला असून 161 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1,04,66,595 वर पोहचला असून 2,22,526 सध्या अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत 1,00,92,909 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून 1,51,160 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिली गेली आहे.