Covid-19 Vaccination India: वय वर्षे 45 पूर्ण असलेल्या सर्वांना आजपासून मिळणार कोरोना लस
Corona Vaccination | Representational Image (Photo Credits: Pixabay

देशातील कोरोना लसीकरण (Covid-19 Vaccination) गती पकडत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आजपासून यात आणखी गती प्राप्त होणार आहे. महत्त्वाचे असे की, 45 वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना आजपासून कोरोना लस (COVID-19 Vaccine) देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी नागरिकांना फायदा पोहोचणार आहे. तसेच, वाढती कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी होण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि देशभरातील राज्य सरकारं प्रयत्नशील आहेत. कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे म्हटले होते की, देशातील 45 वर्षे पूर्ण असलेल्या सर्वच नागरिकांना कोरोना लसीकरण करावे. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आतापर्यंत भारतात केली जाणारे लसीकरण को-विन (CoWIN) पोर्टल द्वारे नोंदणी करुनच केले जात आहे. हे पोर्टला आता अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून केली जाणारी नोंदणी क्षमता वाढविण्यात आली आहे. आता प्रतिदिन एक कोटी लोक या पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करु शकतात. वय वर्षे 45 पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना आजपासून या पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्य मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रामख्याने यात महाराष्ट्राचा मोठा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात अव्वल आहे. देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमणात सर्वाधिक असलेल्या 10 जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्ग आटोक्यात आणायचा तर त्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर द्यायला हवा, असे तज्ज्ञ सांगत आहेत.