कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोसेस मधील वाढलेले अंतर किंवा बदललेला कालावधी यामुळे गोंधळून जावू नका, असे नीती आयोगाचे आरोग्य सदस्य Dr VK Paul यांनी सांगितले. दरम्यान, कोविशिल्ड लसीच्या डोसेस मधील अंतर वाढवल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर Dr VK Paul यांनी स्पष्टीकरण देत नागरिकांचा संभ्रम दूर केला आहे. (Covishield, Covaxin आणि Sputnik V या कोविड-19 लसींमधील नेमका फरक काय? जाणून घ्या लसींची किंमत, डोसेसमधील अंतर आणि परिणाम)
ते म्हणाले की, "कोविशिल्ड लसीच्या डोसेसमधील अंतर अचानक वाढल्याने गोंधळून जाऊ नका. सर्व निर्णय विचार करुनच घेतले आहेत. जर दोन डोसेस मधील अंतर वाढले तर एक डोस घेतलेल्या नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेण्यात आला आहे. यातील सकारात्मक बाब म्हणजे बहुतांश लोक लसीचा पहिला डोस घेऊ शकतील. ज्यामुळे अधिकाधिक लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) संस्थेमध्ये काही अशी तज्ञ माणसं आहेत. जी WHO च्या पॅनल आणि कमिटीचा भाग आहेत आणि या सर्व व्यक्ती त्यांच्या ज्ञानासाठी जगभरात सर्वश्रूत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहिम राबवताना NTAGI ला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करा, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतराबद्दल NTAGI ला अभ्यास करु द्या. युकेमध्ये ही प्रक्रिया फॉलो करुन आणि युजर डेटाचे काळजीपूर्वक परिक्षण करुन दोन डोसमधील अंतर बदलण्यात आले आहे. यापूर्वी युकेमध्ये लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांचे होते. परंतु, त्यानंतर मिळालेल्या डेटावरुन अंतर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तीच प्रक्रीया फॉलो करुन NTAGI त्यावर निर्णय घेतील. त्यासोबतच देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता लसी वितरणाचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.