COVID-19 Vaccination in India: कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
Union Health Minister Dr Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

देशभरात कोविड-19 लसीकरणाला (COVID-19 Vaccination) सुरुवात झाली असून लसीकरणाचा तिसरा टप्पा (Phase 3) मार्च (March) महिन्यात सुरु होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील व्यक्तींना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोविड-19 लसीकरणासाठी केंद्राकडून 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. गरज लागल्यास या रक्कमेत वाढ करण्यात येईल, असे आश्वासनही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले आहे.

16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्यसेवकांना लस देण्याचे योजले असून हे कार्य अगदी सुरळीतपणे सुरु आहे. देशातील काही भागांमध्ये 2 फेब्रुवारीपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये सुमारे 2 कोटी फ्रंटलाईन्स वर्कर्संना लस देण्याची योजना आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल आणि देशभरातील 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु करण्याची तारीख अद्याप सांगणे कठीण आहे. परंतु, मार्च महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे हर्षवर्धन म्हणाले. (COVID-19 Vaccination: भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेतील दुसरा डोस 13 फेब्रुवारी पासून दिला जाणार)

बाजारात उपलब्ध असलेल्या लसींना अनुदान देण्याबाबत आरोग्यमंत्री म्हणाले की, कोविड-19 लसीसाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला असून ते यासंबंधित निर्णय घेतील.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या 1,08,02,591 वर पोहचली असून 1,54,823 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,04,96,308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 1,51,460  सक्रीय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 49,59,445 जणांना लस देण्यात आली आहे.