Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

भारतातील कोरोना विषाणूची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) आता बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. हळूहळू या संसर्गाचा परिणामही कमी होत आहे. अलीकडेच देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या काळात तेथे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले होते. पण दुसरीकडे असे दिसून आले आहे की, कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्याबाबत तामिळनाडू (Tamil Nadu) एक अव्वल राज्य म्हणून उदयास आले आहे. लोकल सर्कलच्या (LocalCircles) सर्वेक्षणानुसार, तमिळनाडूच्या एकूण 59 टक्के लोकांनी कोविडची दुसरी लाट हाताळण्याबाबत तामिळनाडू सरकार प्रभावी ठरल्याचे सांगितले आहे.

तामिळनाडूनंतर आंध्र प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणानुसार आंध्र प्रदेशातील 54 टक्के जनतेने आंध्र प्रदेश सरकारने कोविडच्या दुसर्‍या लाटेची हाताळणी योग्यरित्या केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील 51 लोकांनी, तर महाराष्ट्रातील 47 लोकांनी कोविडची दुसरी लाट योग्य प्रकारे हाताळल्याबाबत महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. त्यानंतर गुजरातचा नंबर असून तिथल्या 46 टक्के लोकांनी सरकार प्रभावी ठरल्याचे सांगितले आहे.

उत्तराखंड 43 टक्के, ओडिशा 43 टक्के, केरळ 39 टक्के, राजस्थान 36 टक्के, हरियाणा 34 टक्के, पंजाब आणि मध्य प्रदेश 28 टक्के, कर्नाटक 25 टक्के, तेलंगणा  23 टक्के, दिल्ली व बिहार 20 टक्के, अशा राज्यांचा नंबर लागतो. पश्चिम बंगालमधील फक्त 17 टक्के लोकांनी सरकार, चाचणी, नियंत्रण, हॉस्पिटलमधील बेड्सची उपलब्धता, ऑक्सिजन, औषधे इ. बाबत प्रभावी ठरल्याचे सांगितले. (हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणार मोठा परिणाम? तज्ञांनी अशाप्रकारे केले भीती व शंकाचे निरसन)

दुसर्‍या लाटेचे उशिरा आगमन आणि इतर राज्यांपेक्षा तुलनेने चांगल्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा फायदा तमिळनाडू राज्यात झाला. राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असूनही, सरकारने कोविडच्या दुसऱ्या लाटेची हाताळणी योग्यरीत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे एकेकाळी देशात सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्राने कोविडच्या दुसरी लाट उत्तमरीत्या हाताळली आहे.