COVID 19 In India: भारतामध्ये दिवसभरातील सर्वाधिक कोरोनाबधितांची नोंद; 24 तासांत 4,14,188 नवे रूग्ण, अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचा  टप्पा 36 लाखांच्या पार
COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मे महिन्याची सुरूवात कोरोनारूग्णांच्या संख्येत विस्फोटक वाढीने झाली आहे. आज भारतामध्ये पुन्हा कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ पहायला मिळली आहे. आतापर्यंतची जगातील सर्वाधिक वाढ आज नोंदवण्यात आली आहे. भारतामध्ये मागील 24 तासांत 4,14,188 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 3,915 आहे. सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,14,91,598 पर्यंत पोहचला आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 आहे. देशात सध्या 36,45,164 जणांवर कोरोनावर उपचार सुरू आहेत.

भारतामध्ये सातत्याने कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढत आहे. पण लसीकरण आणि कोविड 19 गाईडलाईनचं पालन करत या संकटावर मात करण्यासाठी सध्या देशातील आरोग्य यंत्रणा काम करत आहे. देशामध्ये अनेक राज्यांनी आता नियमावली कडक करत लॉकडाऊन जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातही ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चिंताजनक! Andhra Pradesh मध्ये सापडला Covid-19 चा नवा स्ट्रेन; पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा 15 पट अधिक धोकादायक- Report  .

ANI Tweet

भारतामध्ये सध्याच्या घडीला देखील महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रासोबतच दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ मध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत. अद्याप देशात पूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली नाही पण राज्यपातळीवर नियमावली मात्र कडक करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं असणार्‍यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. worldometers च्या माहितीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या जगातील दुसर्‍या क्रमांकाची आहे.

भारतामध्ये एकीकडे दुसरी लाट धुमाकूळ घालत असताना आता तिसर्‍या लाटेचा देखील धोका पाहून आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लहान मुलांना तिसर्‍या लाटेत धोका असल्याने त्यांना सांभाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.