भारतामध्ये आज (18 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात काल 4329 जणांचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 2,63,533 आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे देशात दिवसभरातील नव्या कोरोनाबाधितांचा हा मागील 26 दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा कोरोना संसर्ग कमी होण्यास सुरूवात झाली असल्याचं म्हणता येऊ शकतं. पण अद्यापही पूर्णपणे धोका टळला नसल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून, सरकार कडून करण्यात येत आहे.
दरम्यान भारतात 1 मे पासून 4 लाखाच्या वर देखील 24 तासांत कोरोना रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. 12 मे दिवशी भारतात 24 तासामध्ये 4205 मृत्यू आणि 7 मे दिवशी सर्वाधिक 4,14,188 नवे कोरोनाबाधित नोंदवण्यात आले होते. 21 एप्रिल पासूनच देशात 3 लाखावर कोरोना रूग्ण दिवसागणिक वाढत असल्याने चिंतेत भर पडली होती.
भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,52,28,996 पर्यंत पोहचला आहे. तर 33,53,765 अॅक्टिव्ह रूग्ण नोंदवण्यात आले आहेत.
ANI Tweet
The country recorded highest death toll in a single day with 4329 fatalities in the last 24 hours. The death toll stand at 2,78,719
— ANI (@ANI) May 18, 2021
भारतामध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ ठेवणे आणि डबल मास्क यांच्यासोबत लसीकरण मोहिम देखील वेगवान करण्यात आली आहे. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन सोबत आता स्फुटनिक वी ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. कोविशिल्डचा प्रभाव वाढवण्यासाठी आता त्याच्या दोन डोस मधील अंतर किमान 84 दिवस करण्यात आले आहे.