![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/Dr-Harsh-Vardhan-380x214.jpg)
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan) यांनी आज कोरोना व्हायरस लसी (Coronavirus Vaccine) संदर्भात मोठे विधान केले. आरोग्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाची लस तयार होईल. आरोग्यमंत्र्यांनी ऑनलाईन चर्चेदरम्यान असे सांगितले. यासह, आरोग्यमंत्री म्हणाले की, लस तयार झाल्यानंतर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास मी प्रथम स्वतः ही लस घेईन. ते म्हणाले की जेव्हा ही लस उपलब्ध होईल, तेव्हा सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि अग्रभागी कार्य करणारे कोरोना वॉरियर्स यांना ती दिली जाण्याचा विचार आहे.
सध्या देशातील तीन लस क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत. त्यापैकी दोघे भारताचे तर तिसरे ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे आहेत. नुकतीच ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ते म्हणाले की लस सुरक्षा, खर्च, इक्विटी, कोल्ड-चेन आवश्यकता, उत्पादनाची मुदत यासारख्या मुद्द्यांवरही सखोल चर्चा होत आहे. ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना ही लस प्रथम उपलब्ध करुन दिली जाईल असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री म्हणाले, ‘रेमेडसवीरसारख्या औषधांच्या काळाबाजार होत असल्याचे वृत्त सरकारला प्राप्त झाले आहे. अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला सांगितले आहे. राज्यांनाही याबद्दल बोलण्यास सांगितले आहे.’ (हेही वाचा: देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.88 टक्के, एका दिवसात सर्वाधिक कोरोना मुक्त होणार्या राज्यांंच्या यादीत महाराष्ट्र अव्वल)
सध्या सुरू असलेल्या लसीची चाचणी आणि देशातील विकासाची माहितीही मंत्र्यांनी दिली. सुरक्षित आणि प्रभावी लस नैसर्गिक संसर्गापेक्षा वेगाने कोविड-19 वर प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करेल असेही ते म्हणाले. दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आतापर्यंत 78,586 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.