PM Narendra Modi and Central government staff. (Photo Credit: File)

भारतामध्ये रविवारी दिवसभरात जवळजवळ 4,000 नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली असून, त्यात दिवसभरात 6.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे एकूण आकडा 67,152 वर पोहोचला आहे. भारत कोरोना व्हायरसशी लढत असताना केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जाईल, असा संदेश व्हायरल होत आहे. अनेक माध्यमांनी अशा आशयाच्या बातम्याही दिल्या होत्या. मात्र आता या बातमी खोटी असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनीही याबाबत एक ट्विट करत पगार कपातीची बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र सिंह म्हणतात, ‘कृपया माध्यमांद्वारे प्रसारित केल्या जाणार्‍या बनावट बातम्यांकडे दुर्लक्ष करा. कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात करण्याचा सरकारकडून कोणताही प्रस्ताव नाही.’ अशाप्रकारे लोकांनी खोट्या गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून ‘प्रेस ब्युरो ऑफ इंडिया’द्वारे अशा खोट्या बातम्यांच्यामागील सत्यता लोकांसमोर मंडळी जाते. यांनीही याबाबत ट्विट करत या संदेशाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे, ‘केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सध्याच्या पगारामध्ये कोणत्याही कपातीचा विचार सरकारच्या विचाराधीन नाही. माध्यमांच्या काही विभागांनी अशा पद्धतीचे चुकीचे अहवाल दिले आहेत आणि त्यास कोणताही आधार नाही.’ अशा प्रकारे प्रेस ब्युरो ऑफ इंडियानेही याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा: भारतीय रेल्वे प्रशासनाकडून 12 मे पासून सुरु होणाऱ्या 30 स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या वेळ)

सध्या लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत, अशात होणारे आर्थिक व्यवसाय भरून काढण्यासाठी अनेक कंपन्यांनी पगार कपातीची घोषणा केली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्वाची बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या मिटिंगमध्ये प्रत्येक राज्याची स्थिती व लॉक डाऊनबाबत आढावा घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या पुढील रणनीतीवर केंद्रित होती.