Coronavirus: भारतातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 49,391; डिस्चार्ज मिळालेल्यांचाही आकडा वाढला
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 49,391 इतकी झाली आहे. त्यातील 33,514 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 14,182 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने व बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 1694 रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. डिस्चार्ज मिळालेले, उपचार घेत असलेले आणि मृत्यू झालेले अशा सर्वांची मिळून देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी 49,391 इतकी झाली आहे.

दरम्यान, भारताच्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीत महाराष्ट्रातील आकडेवारीचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येबाबत शेवटची अद्ययावत माहिती हाती आली तेव्हा हा आकडा 15525 वर पोहोचली आहे. देशातील सर्व राज्यांची तुलना करता महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठी आहे. अर्थात महाराष्ट्रात होणाऱ्या कोरोना व्हायरस चाचण्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

कोरोना व्हायरस हे केवळ महाराष्ट्र आणि भारतावरचेच संकट नाही. तर, ते संपूर्ण जग आणि अवघ्या मानवजातीवरचेच संकट आहे. भारताचा शेजारी देश चीनमधील वुहान प्रांतातून या संकटाचा जन्म झाला. कोरोना व्हायरस संक्रमनाचा पहिला रुग्ण हा चीनमध्ये सापडला होता. चीनमधून पुढे प्रवासी, पर्यटक आणि देशविदेशांतील व्यवहारांमुळे हा व्हायरस जगभर पसरला. (हेही वाचा, Coronavirus: केरळमधील कोरोना व्हायरस रुग्णांवर सुरु होणार Zingivir-H या आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल चाचणी; CTRI ने दिली मान्यता)

एएनआय ट्विट

जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी (5 मे 2020) सकाळी कोरना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झालेल्या जगभरातील रुग्णांची संख्या 35,82,469 इतकी आहे याच आकडेवारीनुसार अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक 11,80,288 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. अमेरिकेनंतर स्पेन (218,011), इटली (211,938), यूके (191,832), फ्रांस (169,583), जर्मनी (166,152), रशिया (145,268), तुर्की (127,659) आणि ब्राजील (108,266) अशी क्रमवारी आहे.