Coronavirus: मोदी सरकारच्या कोरोना व्हायरस पॅकेजवर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी काय म्हणाले?
Abhijit Banerjee (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेले 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज (Coronavirus Package) अत्यंत तोकडे असल्याचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी (Nobel Laureate Abhijit Banerjee) यांनी म्हटले आहे. अभिजीत बनर्जी (Abhijit Banerjee) म्हणतात की, हे संकट काही आठवड्यांतच संपेल असे केंद्र सरकारला वाटते असे या पॅकेजवरुन दिसते. पण, हे संकट प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकू शकते. सीएनबीसी टीव्ही 18 या वृत्तवाहिनीशी बोलताना बनर्जी यांनी हे मत व्यक्त केले आहे. या वेळी बोलताना बनर्जी यांनी म्हटले आहे की, भारतातील गरीबांबद्दलच बोलायचे तर, 500 रुपये ही रक्कम काहीच नाही.

पुढे बोलताना बनर्जी यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी आगोदरपासूनच उपाययोजना सुरु करायला हवी होती. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी 1.7 लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजच्या माध्यमातून देशातील कामगार, कर्मचारी, महिला, शेतकरी आणि व्यवसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, जनधन योजना अंतर्गत 20 कोटी महिलांच्या बँक खात्यांवर 500 रुपये प्रति महिना रक्कम जमा करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. उज्ज्वला योजना अंतर्गत जूनपर्यंत गॅस सिलिंडरही मोफत दिले जाणार आहेत. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: जगात 7 लाख 54 हजार 948 कोरोना प्रकरणे, तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती)

पुढे बोलताना अभिजित बनर्जी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देश आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे बंद करायला हवे. सरकारे म्हटले होते की, लॉकडाऊन काळात आवश्यक त्या सर्व सेवा सुरु ठेवण्यात येतील. पण हे एक प्रकारे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करणारेच आहे. जसे की, दुकाने सुरु असतील पण कोणीही घराबाहेर पडायचे नाही, असे म्हणने. सरकारच्या या वक्तव्यामुले पोलिसही संभ्रमीत झाले आणि दुकाने बंद करताना दिसले. यासोबतच सरकारच्या इतर घोषणांमध्येही गोंधळ दिसला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च या दिवशी रात्री आठ वाजता घोषणा केली होती की, आज म्हणजेच 25 मार्चच्या रात्री 12 वाजलेपासून संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात येत आहे.