कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आता संसदेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे बॉलिवूड गायिका कनिका कपूर(Kanika Kapoor). होय, विदेशातून थेट भारतात आल्यावर कनिका कपूर ही एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. या पार्टीला राजस्थान येथील नेत्या वसुंधरा राजे यांचे पूत्र खासदार दुष्यंत सिंह (MP Dushyant Singh) हेसुद्धा उपस्थीत होते. त्यामुळे या पार्टीत दुष्यंत सिंह हे कनिका हिच्या संपर्कात आले होते काय याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान, असेही वृत्त आहे की, कनिका हिच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर दुष्यंत सिंह हे संदसेच्या सभागृहातही गेले होते.
प्राप्त माहितीनुसार, बॉलिवुड गायिका कनिका कपूर ही 15 मार्च या दिवशी लंडन येथे होती. तिथून परत आल्यावर ती लखनौ येथे एका पार्टीला गेली. या पार्टीत दुष्यंत सिंह यांच्याससह इतरही अनेक मान्यवर मंडळी सहभागी होती. दरम्यान, कनिका कपूर हिच्या संपर्कात आल्यावर दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला आपल्या घरातच अलगिकरण कक्षात राहवे अशा सूचना करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, Coronavirus: बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण)
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे की, मी आणि माझा मुलगा दुष्यंत सिंह आम्ही मिळून एका पार्टी आणि स्नेहभोजनास गेलो होतो. बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिलाही निमंत्रण असल्याने ती या पार्टीसाठी उपस्थित होती. दुर्दैवाने तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मी आणि मुलाने स्वत: क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय ट्विट
Vasundhara Raje,BJP leader:While in Lucknow,I attended a dinner with my son Dushyant&his in-laws. Kanika, who has unfortunately tested positive for #Covid19 was also a guest. As a matter of abundant caution, my son&I have immediately self-quarantined&we’re taking all precautions. pic.twitter.com/MD3r0XZXu4
— ANI (@ANI) March 20, 2020
खा. दुष्यंत सिंह यांच्याबाबत आणखी एक महत्त्वाचे वृत्त म्हणजे कनिका कपूर हिच्या पार्टीत सहभागी झाल्यावर दुष्यंत सिंह हे लोकसभेत वारंवार उपस्थित राहिले. पुढे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या राजस्थान आणि उत्तरप्रदेश खासदारांच्या बैठकीतही सहभाग घेतला. सांगितले जात आहे की, कनिका हिच्या पार्टीत सुमारे 500 लोक सहभागी झाले होते. आरोग्य विभाग सध्या कनिका हिच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा तपास करुन त्यांची तपासणी करण्याच्या कामी गुंतला आहे.