![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/Untitled-design-5-1-380x214.jpg)
देशातील काही राज्यांमध्ये वाढत असलेली कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पाहाता दिल्ली सरकार (Delhi Government) सावध झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांमधून दिल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांना दिल्ली सरकारने RT-PCR Test बंधनकारक केल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ज्या नागरिकांची RT-PCR Test झाली असेल त्यांनाच दिल्लीमध्ये प्रवेश मिळेल असेही समजते.
गेल्या आठवडाभरापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील जवळपास 86% कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांतून असल्याचे पुढे येतआहे. त्यामुळे दिल्लीत या रुग्णवाढीचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली सरकारकडून या पाच राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सांगितले जाण्याची शक्यता आहे की, आपल्या राज्यातून दिल्लीला येणाऱ्या नागरिकांची 72 तासांपूर्वी निगेटीव्ह RT-PCR टेस्ट निश्चित करावा. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या दिशेने निघू द्यावे. (हेही वाचा, Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय)
प्राप्त माहितीनुसार दिल्ली सरकारने काढलेला हा आदेश शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी ते 15 मार्च दुपारी 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील. हे आदेश विमान, रेल्वे आणि बस आदी माध्यमातून दिल्लीला येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असतील.
महाराष्ट्र राज्यात कमी झालेला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 6,218 नवे रुग्ण आढळून आले. अनेक उपाय योजना करुनही राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते आहे, ही मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.