Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय
Maharashtra Police | (PTI photo)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गात कार्यकालीन वेळेत बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. त्यानंतर आता पोलिस दलाच्या (Maharashtra Police) कार्यकालीन वेळेतही बदल करण्यात येणार असून यासंबंधितचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल (Sanjeev Kumar Singhal) यांनी दिले आहेत. यासाठी अ, ब, क, ड असे चार गट पाडण्यात आले असून विशिष्ट टक्केवारी आणि शिफ्टनुसार उपस्थिती ठरवण्यात आली आहे. तसंच 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) चाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची 100 टक्के तर क आणि ड गटातील कर्चमाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती असेल. त्यापैकी 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत उपस्थित राहतील. तर 25 टक्के कर्मचारी 11 ते 5 या वेळेत हजेरी लावतील. उर्वरीत क आणि ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. हे कर्मचारी फोनवर उपलब्ध असतील. मात्र गरजेच्या वेळी या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात येईल.

दरम्यान, कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा ची नीती आयोगाच्या बैठकीतही उपस्थित केला होता. त्यानंतर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याचे तसंच वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. (Coronavirus: आता दोन शिफ्ट्समध्ये चालणार मंत्रालयातील कामकाज, वर्क फ्रॉम होमचीही सोय; नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश)

तसंच या नव्या कार्यसंस्कृतीचा अवलंब केल्याने काम पूर्ण क्षमतेने पार पडेल आणि कोरोनाचा धोकाही कमी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान चेक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.