Coronavirus: आता दोन शिफ्ट्समध्ये चालणार मंत्रालयातील कामकाज, वर्क फ्रॉम होमचीही सोय; नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील (Ministry) कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचा विचार सुरु आहे
कोरोना विषाणू (Coronavirus) काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सध्या जवळजवळ सर्व कार्यालयांनी त्यांचे वर्क कल्चरही बदलले आहे. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देत आहेत. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील (Ministry) कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचा विचार सुरु आहे. याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. याआधी कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते.
आता महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले. (हेही वाचा: पोहरादेवी येथे जमलेल्या गर्दीची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश)
यासह, मंत्रालयात दररोज भेट देणाऱ्या लोकांची संख्याही खूप वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक-दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2021 11:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

