पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ होताना दिसत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज पोहरादेवीच्या (Poharadevi) मंदिरामध्ये दिसून आलेल्या तोबा गर्दीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे. करोना संकटाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी झाल्याने संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सीएम उद्धव ठाकरे पोहरादेवीतील गर्दीमुळे नाराज असल्याचे दिसत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपाने संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड सार्वजनिक कार्यक्रम आणि मीडियापासून दूर होते. मंगळवारी सकाळी ते लोकांसमोर आले. ते आपल्या काफिलासह पोहरादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. ते मंदिरात धार्मिक विधींमध्येही सामील झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पोहरादेवी मंदिर संकुलात जमलेली दिसून आली. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान संजय राठोड यांच्या समर्थकांनी मास्क आणि सामाजिक अंतरांचे अनुसरण केले नाही. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
रविवारी, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही असे सांगितले होते. मात्र आज पोहरादेवीच्या मंदिरामध्ये हे सर्व नियम डावलले गेलेले दिसले. गर्दी हटवण्यासाठी यावेळी समर्थकांवर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. त्यांनतर मुख्यमंत्रांच्या आदेशाचे उल्लंघन केले जाते आहे, जिल्हा प्रशासन म्हणून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. (हेही वाचा: Sanjay Rathod at Poharadevi Temple: संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे सपत्नीक घेतले सेवालाल महाराजांचे दर्शन)
या घटनेनंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना, शिवसेना प्रवक्ता मनिषा कांयदे यांनी, ‘संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिके नव्हते, प्रत्येकाने जबाबदारी पाळली पाहिजे होती’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आज राज्यात कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.