महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज 15 दिवसांनंतर लोकांसमोर आले आहेत. सकाळी यवतमाळ येथील त्यांच्या घरातून ते सपत्निक ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी आले. पोहरादेवी मंदिरात (Poharadevi Temple) रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत झाले. तर महंतांनी संजय राठोड यांच्यासाठी खास होम हवनाचे आयोजन केले होते. यामध्ये संजय राठोड सहभागी झाले. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं. दरम्यान पोलिस बंदोबस्ता सोबतच संजय राठोड यांच्या समर्थकांची देखील पोहरागडावर दाखल झाले आहेत. यावेळी महंत बाबूसिंह महाराज देखील सहभागी झाले होते.
संजय राठोड हे शिवसेना नेते आहे. बंजारा समाजामधील ते महत्त्वाचे नेते आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यावर वनमंत्री खात्याची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांचे नाव आलं आहे. त्यांचे काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. ही चर्चा सुरू असली तरीही अद्याप याप्रकरणी संजय राठोड यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
संजय राठोड यांच्या वायरल ऑडिओ क्लिप नंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचं नाव न घेता चौकशीची मागणी करणारं पत्र पोलीस महासंचालकांना दिलं असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
आज पोहरादेवी गडावर बंजारा समाजाने शक्तिप्रदर्शन केले आहे. बंजारा समाज पारंपारिक वाद्य वाजवून गाणी गाताना लोकं दिसली आहेत. पण संजय राठोड यांच्या समर्थनार्थ गर्दी करताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला आहे.