PM Narendra Modi (Photo Credits: Twitter/@NarendraModi)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक त्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सध्या कोरोचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत असल्याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या संवादामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवावा असा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडला आहे. यापूर्वी ओडिशा नंतर पंजाब राज्याने त्यांच्या लॉकडाउनच्या नियमात वाढ केली आहे. तर आता मुंबई, दिल्लीसह अन्य बड्या शहरांमध्ये लॉकडाउन अजून 15 दिवसांनी वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. परंतु नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार नसल्याची माहिती सरकारमधील सुत्रांनी दिली आहे.

विविध राज्यातील लॉकडाउन वाढण्याची शक्यता असली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात देशाला संबोधणार नाही आहेत. यापूर्वी 24 मार्चला नरेंद्र मोदी यांनी प्रथम नागरिकांसोबत संवाद साधत 21 दिवसांच्या लॉकडाउनचे आदेश जाहिर केले होते. त्यानंतर अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी थाळी वाजवा असे आवाहन केले. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाच्या अंधकार दुर करण्यासाठी घरातील लाईट्स बंद करुन दिवा लावण्याचे ही नागरिकांना आवाहन केले होते. आज लॉकडाउनचा 18 दिवस असून अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढण्याच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी संवाद साधतील असे बोलले जात होते. मात्र मोदी देशाला संबोधणार नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.(Coronavirus: संपूर्ण देशात 'भिलवाडा मॉडेल'चे कौतुक; जाणून घ्या इथल्या प्रशासनाने नक्की कसे मिळवले कोरोना विषाणूवर नियंत्रण)

दरम्यान, भारतात मागील 24 तासात कोरोनाचे 1035 नवे रुग्ण समोर आले असून सद्य घडीला भारतात 7447 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर अन्य 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण आकडेवारीत सद्य घडीला 6565 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, 643 जणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आतापर्यंत कोरोनाने देशात 239 बळी घेतले आहेत. ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक असली तर कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या केल्याने संबंधित वाढ समोर येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.