Coronavirus In India Updates: भारतात गेल्या 29 दिवसात 100% पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून डिस्चार्ज दिल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

Coronavirus In India Updates: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 44 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. जगभरातील अन्य देशांपेक्षा भारतात कोरोनाची परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. याच दरम्यान आता आरोग्य मंत्रालयाने(Ministry Of Health) कोरोनाच्या परिस्थितीबद्दल एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार देशात गेल्या 29 दिवसात 100 टक्क्यांहून अधिक कोरोनासंक्रमितांची प्रकृती सुधारली असून त्यांन डिस्चार्ज दिल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत भारतात कोरोनाग्रस्तांच्या रिकव्हरीमध्ये अद्भूतपूर्व वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लसीचा अभ्यास करत आहेत. तसेच देशाला लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होईल अशी आशा सुद्धा व्यक्त केली जात आहे. ऐवढेच नाहीतर कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी ही कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत.(COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी भारतात सुरु राहणार; युके मधील स्थगितीनंतर सीरम इंस्टीट्यूटची माहिती)

तसेच 10 सप्टेंबर पर्यंत एकूण 5,40,97,975 सॅम्पलच्या चाचण्या पार पडल्या आहेत. त्यापैकी 11,63,542 सॅम्पल्सची चाचणी काल पूर्ण झाल्याचे ICMR कडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील अनेक देशांना ग्रासले आहे. जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने आता ब्राझीलला मागे टाकले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका प्रथम असून भारत दुसऱ्या स्थानी आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 43 लाखांच्या पार गेला असून मृतांची संख्या 73 हजारांहून अधिक झाली आहे. दिवसागणित कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या विकासाकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.