Coronavirus In India: भारतात सलग दुसर्‍या दिवशी कोविड 19 मुळे उच्चांकी 4529 जणांचे मृत्यू
COVID-19 Deaths | Photo Credits: PTI

भारतामध्ये कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे (Coronavirus Second Wave) मोठा हाहाकार पसरल्याचं मागील काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरूवातीच्या काही दिवसांत 24 तासांत 4 लाखांच्या वर कोरोनारूग्ण आढळणार्‍या भारतात आता कोविड 19 (COVID-19) ची लागण झालेल्यांचा आकडा 3 लाखापेक्षा कमी झाला असला तरीही मृत्यूची संख्या वाढत आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी भारतामध्ये कोविड 19 मुळे आतापर्यंत उच्चांकी मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरामध्ये 4529 जणांचा देशात कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये आज नव्याने कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 2,67,334 आहे. अद्याप देशात 32,26,719 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 2,54,96,330 पर्यंत पोहचला आहे. तर एकूण मृत्यूंची संख्या 2,83,248 आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम देखील आता वेगवान करण्यात आली आहे. देशात 18,58,09,302 लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली आहे. (नक्की वाचा: दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट; गेल्या 24 तासात एक हजारांहून कमी रुग्णांची नोंद).

ANI Tweet

भारतामध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक वेगाने पसरत आहे. देशामध्ये काही म्युटंट वायरस असल्याने आरोग्य यंत्रणा आणि वैज्ञानिकांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे म्युटंट वायरस अधिक वेगाने पसरत असल्याने इंफेक्शनचा धोका देखील अधिक आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना रिइंफेक्शन देखील होत असल्याने सरकारने घालून दिलेल्या कोविड 19नियमावलीचं पालन काटेकोर पणे करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत.