प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतातील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अधिक गहिरे होऊ लागले आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत 24,850 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी भर आहे. तर 613 रुग्णांचा कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. या मोठ्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,73,165 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,44,814 अॅक्टीव्ह केसेस (Active Cases)  आहेत. म्हणजेच सध्या या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 4,09,083 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 19,268 रुग्णांचा बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 60.80% इतका आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली येथे कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारची देखील मदत होत आहे. (Coronavirus Update: महाराष्ट्रात 2 लाखाहुन अधिक कोरोनाबाधित; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण जाणुन घ्या)

ANI Tweet:

केंद्र सरकारकडून आतापर्यंत तब्बल 11300 मेक इन इंडिया व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 6154 व्हेंटिलेटर्स हॉस्पिटल्समध्ये पोहचले आहेत. तर आरोग्य मंत्रालयाकडून 1.02 लाख ऑक्सिजन सिलेंडर्स संपूर्ण देशभरात पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 72,293 सिलेंडर्स डिलिव्हर झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. यासह N95 मास्क, PPE कीट्स आणि HCQ टॅबलेट्सचे केंद्र सरकारकडून राज्यांना मोफत वाटप करण्यात आले आहे.