Coronavirus in Andaman: अंदमान येथील दुर्मिळ 50 लोकांच्या जमातीमधील 10 जणांना कोरोना विषाणूची लागण; 6 जण झाले बरे, 4 जणांवर उपचार सुरु
Andaman and Nicobar Islands (Photo credits: Facebook)

अंदमान (Andaman) आणि निकोबार बेटांवर गेल्या एका महिन्यात एका बेटावर राहणाऱ्या दुर्मिळ अशा  ग्रेट अंडमानिज (Great Andamanese) जमातीतील 10 लोकांना कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची पुष्टी झाल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचे या जमातीमधील सध्या जवळजवळ 50 लोकच अस्तित्वात आहेत. यामुळे आता दुर्गम द्वीपसमूहातील या गटाच्या आणि अन्य मूळ लोकांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या दहापैकी सहा जणांना एका महिन्यापूर्वी आणि चार जण आठवड्यातच संक्रमित झाल्याचे आढळले आहे. त्यातील दोन जणांना पोर्ट ब्लेअर (Port Blair) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि दोघांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, सध्या ग्रेट अंदमानीज जमाती (Great Andamanese) मधील केवळ 53 लोक जिवंत आहेत. इथल्या 37 निवासी बेटांपैकी असलेल्या स्ट्रॅट आयलँडचे ते रहिवासी आहे. हे उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात येते. या ठिकाणी सरकार या लोकांच्या खाण्या-पिण्याची व राहण्याची व्यवस्था करत आहे. साधारण 4 लाख लोकसंख्या असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या पूर्वेकडील भागात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2,985 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील 41 लोकांचा मृत्यूची झाला आहे. जूनच्या प्रारंभी येथे कोरोनाचे पहिले प्रकरण आढळले होते.

नुकतेच या द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये आदिवासी जमातीमधील सहा सदस्यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यानंतर, रविवारी आरोग्य अधिकाऱ्यांची एक टीम स्ट्रेट आयलँड येथे पाठविली, त्यानंतर इतर काही लोक सकारात्मक आले. या जमातीमधील बरेच लोक पोर्ट ब्लेअरकडे ये-जा करतात, त्याद्वारेच कोरोना संसर्ग इतर लोकांपर्यंत पोहोचला आहे. यातील काही लोक पोर्ट ब्लेअरमधील सरकारी विभागांमध्येही कार्यरत आहेत. (हेही वाचा: Lockdown: मुलांना शाळेत पाठविण्याबाबत देशभरातील पालक काय विचार करतात? घ्या जाणून)

अंदमान बेट हे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पाच जमातींचे घर आहे, त्यामध्ये जरावा, उत्तर सेंटिनेलिज, ग्रेट अंडमानिज, ओंग आणि शोम्पेन यांचा समावेश आहे. त्यापैकी जरावा आणि उत्तर सेंटिनेलिज आदिवासी लोक सामान्य लोकांच्या संपर्कातहि आले नाहीत. आता आरोग्य कर्मचार्‍यांची टीम ओंग जमातीतील 115 सदस्यांची तपासणी करणार आहेत. याशिवाय शोम्पेन टोळीतील लोकांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. आतापर्यंत अंदमान बेटांच्या दहा बेटांवर संसर्ग झाल्याचे डॉक्टर रॉय यांनी सांगितले. अंदमानमध्ये कोविडशी लढण्यासाठी दोन रुग्णालये, तीन आरोग्य केंद्रे आणि दहा केअर सेंटर आहेत. इथला टेस्टिंग रेटही उर्वरित भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहे.