कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. एखाद्याची छोटीशी चूक देखील मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. आता तर जवळजवळ प्रत्येकजण या साथीच्या आजाराबद्दल जागरूक आहे. या विषाणूची भीती इतकी वाढली आहे की, आता लोक चक्क प्राण्यांनाही क्वारंटाईन (Quarantine) करू लागले आहेत. होय ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल मात्र हे सत्य आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी जिल्ह्यात सध्या या गोष्टीची चर्चा आहे, कारण येथे चक्क रेड झोन भागातून आलेला एक घोडा (Horse) आणि त्याच्या मालकाला क्वारंटाईन केले आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत खबरदारी घेत प्रशासनाने घोड्याला अलग ठेवले आहे.
राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त शेरसिंह यांच्या म्हणण्यानुसार, हा घोडा मंगळवारी काश्मीरच्या शोपियान भागातील, म्हणजेच रेड झोनमधील 21 वर्षीय तरूणाने जिल्ह्यात आणला. तो तरुण शोपियानहून मुघल रोड मार्गे येणार्या पाच जणांपैकी एक होता. या सर्वांना देहरा की गढीजवळ रोखण्यात आले आणि त्यांना विलगीकरण केंद्रात पाठवले. यांचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. मंगळवारी पशुवैद्यकांच्या पथकाने घोड्याची चाचणी घेतली व त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. (हेही वाचा: भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये आढळली कोरोना व्हायरसची लक्षणे; रुग्णालयात दाखल)
घोडा व त्याच्या स्वारांसह इतर लोक रेड झोन भागातून आले होते, त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी, या लोकांपासून कोरोना विषाणूचा धोका उद्भवू शकतो असे सांगितले आहे. सिंह यांनी पुढे सांगितले की, त्यांनी या घोड्याला त्याच्या मालकाच्या कुटुंबाकडे सोपवण्यास परवानगी दिली आहे. मात्र या घोड्याला 14 दिवस वेगळे ठेवा व सावधगिरी बाळगल्याशिवाय किंवा रिपोर्ट नकारात्मक येऊ पर्यंत त्याच्या जवळ जाऊ नका असा सल्ला दिला आहे.