HD Deve Gowda | (File Photo)

देशाचे माजी पंतप्रधान आणि JDS नेते एचडी देवेगौडा ( HD Deve Gowda) यांची आणि त्यांच्या पत्नी चन्नम्मा देवेगौडा (, Chennamma Deve Gowda) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. एचडी देवेगौडा यांनी बुधवारी (31 मार्च) ट्विट करत म्हटले की, ''माझी आणि माझ्या पत्नीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आम्ही आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आयसोलेट झालो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की, आमच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करु नये.''

देवेगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला. पंतप्रधानांनी देवेगौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनीच ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. एचडी देवेगौडा यांनी मोदी यांनी फोन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. देवेगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले की, कोणत्याही शहरातील रुग्णालयात ते उपचार घेऊ शकतात. दरम्यान, सध्या तरी बंगळुरु येथे राहूनच उपचार करुन घ्यावेत असा मनोदय देवेगोडा यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Paresh Rawal Tested COVID-19 Positive: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी घेतला होता कोरोनाचा पहिला डोस)

कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. मंगळवारी (30 मार्च) कर्नाटकमध्ये 2,975 नवे कोरोना संक्रमित आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9,92,779 इतकी झाली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने ही माहिती दिली. या माहितीनुसार कर्नाटकमध्ये आतापर्यंत 12,541 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9,54,67 कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2,13,02,658 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.