Corona Wale Baba (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात अद्याप कोणताही उपाय, औषध अथवा लस उपलब्ध नाही. असे असले तरी भारतात सोशल मीडिया आणि लोकचर्चा यांमधून अपवांचे पीक मात्र जोमात आले आहे. याचाच फायदा काही भोंदूबाबा आणि बोगस डॉक्टर, समाजकंटक घेताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी असाच एक कोरोना बाबा (Corona Wale Baba) अटक करुन गजाआड केला आहे. हा बाबा ताईत आणि अंगारा फूंकुन कोरोना व्हायरस बरा करत असल्याचा दावा करत होता. लोकांनी या बाबांवर आरोप करत तक्रार केल्यावर पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस अधिकारी वजीरगंज दीपक दुबे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, या बाबाने अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस बरा करण्याचा दावा करणारे पोस्टर लावले होते. लोकांच्या माध्यमातून त्याबाबत माहिती मिळाल्यावर या बाबाचा शोध घेण्यात आला. अहमद असे या बाबाचे नाव असून, तो जवाहर नगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमद याच्या विरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई महापालिका सतर्क, कोरोना व्हायरस बाबत खोटी माहिती, अफवा पसरवणाऱ्यांवर करणार कडक कारवाईचे संकेत)

लखनऊ येथील डालीगंज जवळील या बाबाचे पोस्टर अनेकांना आकर्षित करत होते. बाबाने आपल्या पोस्टरमध्ये दावा केला होता की, ज्यांच्या जवळ मास्क आणि सॅनिटायजर खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत अशा लोकांसाठी आपल्याकडे उपाय आहे. केवळ 11 रुपयांचा ताईत घेऊन कोरोना व्हायरस बरा करण्यात येतो, असा दावा हा बाबा करत होता.

दरम्यान, लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या बाबाने प्रसिद्ध केलेल्या पोस्टर्सवर दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क केला. पोलीस आपल्याशी बोलतायत हे लक्षात आल्यावर या बाबाने फोन बंद करुन ठेवला. त्यानंतर पोलीसांनी नागरिकांनी दिलेल्या माहितीवर शोध घेऊन बाबाला शोधून काढले.