Coronavirus: सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर 'ही' अट पाळा, केंद्र सरकारकडून नागरिकांना सूचना
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Coronavirus: कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत लसीकरणाचा सुद्धा वेग देशात वाढवला जात आहे. मात्र लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना काही गोष्टींसाठी सूट दिली गेली आहे. अशातच आता केंद्र सरकारने सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास काही अटींचे पालन करावे लागणार आहे असे जाहीर केले आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने असे म्हटले की, मोठ्या संख्येने मेळाव्यांना गर्दी कमी केली पाहिजे, परंतु जर त्यात सहभागी होणे आवश्यक असेल तर पूर्ण लसीकरण पूर्व-आवश्यक असले पाहिजे. तसेच लोकांनी कोरोनाच्या विरोधातील लस घेणे आणि विशेषतः सणासुदीच्या काळात कोविड अनुकूल वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन केले.

एका संवाद संम्मेलनात सरकारने सूचित केले की, आठडाभरातील रुग्णांचा दर हा कमी झाला आहे. मात्र भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कमी झालेली नाही. केंद्राने असे म्हटले की, देशातील 39 जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात कोविड संक्रमणाचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक होता. तर 38 जिल्ह्यांमध्ये हा दर 5-10% दरम्यान होता.(Work From Home: ऑफिसात पुन्हा एकदा रुजू होण्याची 75 टक्के लोकांची इच्छा, सर्वेमध्ये सांगितली 'ही' बाब)

सरकारने असे सांगितले की, 16 टक्के वयस्कर नागरिकांना कोविडच्या विरोधातील लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. तर 54 टक्के लोकांना लसीचा फक्त एकच डोस दिला गेला आहे. तर सिक्किम, दादरा-नगर हवेली तसेच हिमाचल प्रदेशात 100 टक्के वयस्कर नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा कमीत कमी एक डोस दिला गेला आहे.

देशात कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करता आणि आगामी सणासुदीचे दिवस पाहता केंद्राने सामूहिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु त्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर पूर्णपणे लसीकरण झालेले असावे. तसेच नागरिकांनी घरातच सण साजरे करावेत. देशात सार्स-सीओवी-2 डेल्टा प्लसचे जवळजवळ 300 प्रकरण समोर आली आहेत.