प्रातिनिधिक प्रतिमा (Image: PTI)

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी सुरु आहे. अशात उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प आहेत. लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता असताना रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रातून एक चांगली बातमी येत आहेत. प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म एनरॉकच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी देशातील सात मोठ्या शहरांमधील घरांच्या विक्रीत 35 टक्क्यांची घसरण होऊ शकते. ही शहरे दिल्ली-एनसीआर (गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद), मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद अशी आहेत. याचाच अर्थ या शहरांमधील घरांच्या किंमती कमी होऊ शकतात.

व्यावसायिक मालमत्तांच्या विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो असे, कंपनीने एका अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार भाडेपट्ट्यावर कार्यालय घेण्यामध्ये 30 टक्के आणि किरकोळ क्षेत्रात 64 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. एनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, आधीपासूनच कमी मागणी तसेच पैशांची कमी यामुळे अडचणीत आलेल्या भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रावरही कोरोना व्हायरसचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

मालमत्ता तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या सहा महिन्यांत संपूर्ण कामगार परत येण्यासह, नवीनतम आर्थिक परिस्थितीत निधी उभारणे हे देखील बिल्डर्ससाठी  मोठे आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या बाजूने देखील मालमत्ता तयार होण्यास विलंब होईल. एकंदरीत, प्रकल्पाच्या वितरणात आणखी एक वर्ष लागू शकेल. अशा परिस्थितीत सरकारकडून विकासकांना सवलत द्यावी अशी मागणी होत आहे. (हेही वाचा: दिल्ली एनसीआर येथील एका रियल एस्टेट ग्रुपकडून 3,000 कोटी Black Money जप्त, आयकर विभागाची कारवाई)

इंडिया रेटिंग्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, प्रत्येक आर्थिक वर्षात बांधकाम कंपन्यांच्या वार्षिक उत्पन्नापैकी 30-35 टक्के उत्पन्न चौथ्या तिमाहीत येते. मात्र सध्या या एक महिन्याच्या बंदीमुळे त्यामध्ये 10 टक्के घट होऊ शकते.