गोव्यात सर्व खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केली मोठी घोषणा
Pramod Sawant (Photo Credits: ANI)

गोव्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोना ग्रस्तांवर त्वरित उपचार व्हावेत यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्यातील सर्व खासगी रुग्णांलयामध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. गोवा सरकारने (Goa Government) उचलले हे पाऊल खूपच कौतुकास्पद असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर तातडीन उपचार होणे शक्य होईल. गोव्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्येत वाढ व्हावी आणि येथील परिस्थिती लवकर आटोक्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोवा सरकारने राज्यातील 21 खासगी रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोनावरील उपचारांचे अधिकार आता आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगी रुग्णालयात आता सरकारच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात खासगी रुग्णालयांकडून काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे गोवा सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.हेदेखील वाचा- गोव्यातील जीएमसीएच मध्ये गेल्या 4 दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू, 'या' पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेटाळला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि ऑक्सिजनचा तुटवडा यांचा परस्पर संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान भारतात मागील 24 तासांत 3 लाख 11 हजार 170 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 4077 रुग्ण दगावले आहेत. यामुळे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,46,84,077 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 2,70,284 वर पोहोचला आहे. भारतात सद्य घडीला 36 लाख 18 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 2,07,95,335 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.