Kolkata Teacher Resigns Over Hijab: कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका खाजगी महाविद्यालयातील शिक्षिकेने(Teacher) हिजाबवरून वादाच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा(Resigns) दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर महाविद्यालयीन प्रशासनाने गैरसमजतीतून हे प्रकरण झाल्याचे उत्तर देत शिक्षिका पुन्हाला कामावर रुजू होतील असे म्हटले आहे. सध्या शिक्षिकेने महाविद्यालयात शिकवण्या घेणे बंद केले आहे. शिक्षिका आणि महाविद्यालयातील काही जणांच्या वादाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. कारण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तिला कामाच्या ठिकाणी हिजाब घालण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली होती. (हेही वाचा:Karnataka- Congress Govt Ends Hijab Ban: कर्नाटक सरकार हिजाब बंदीचा आदेश मागे घेणार; मुख्यमंत्री Siddaramaiah यांची घोषणा)
तथापि, हे प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर आणि गोंधळाची ठिणगी पडल्याने, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी असा दावा केला की हा गैरसंवादाचा परिणाम आहे आणि शिक्षिका 11 जून रोजी राजीनामा मागे घेऊन परत येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून एलजेडी लॉ कॉलेजमध्ये शिक्षिका असलेल्या संजिदा कादर यांनी 31 मे नंतर कामाच्या ठिकाणी हिजाब न घालण्याची सूचना कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी केल्याच्या आरोपानंतर 5 जून रोजी राजीनामा दिला होता.
'महाविद्यालयाच्या प्रशासकीय समितीने दिलेल्या आदेशामुळे माझी मूल्ये आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या,' असे शिक्षिका म्हणाली. संजिदा मार्च-एप्रिलपासून कामाच्या ठिकाणी डोक्यावर स्कार्फ घालून जात होत्या. गेल्या आठवडाभरात हा वाद वाढला. शिक्षिकेचा राजीनामा सार्वजनिक झाल्यानंतर, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि हा केवळ एक गैरसमज असल्याचा दावा केला. महाविद्यालयात शिक्षिकेला कामाच्या वेळेत कपड्याने डोके झाकण्यास कधीही मनाई केली नाही, असे स्पष्टीकरण दिले.
त्यावर शिक्षिकेने म्हटले की, "मला सोमवारी ऑफिसमधून ईमेल आला. मी पुढचा विचार करेन आणि मग निर्णय घेईन. पण मी मंगळवारी कॉलेजला जाणार नाही,"असे त्या म्हणाल्या. ईमेलमध्ये असे म्हटले आहे की सर्व प्राध्यापकांच्या ड्रेस कोडनुसार, ज्याचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते आणि त्याचे मूल्यांकन केले जाते, ती वर्ग घेत असताना डोके झाकण्यासाठी दुपट्टा किंवा स्कार्फ वापरण्यास मोकळी होती.