राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेल्या 'भारत जोडो यात्रे'त (Bharat Jodo Yatra) काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या आहेत. भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) कर्नाटक (Karnataka) येथील मंड्या येथे आली आहे. याच ठिकाणी सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या. सोनिया गांधी सोमवारी दुपारी म्हैसूरला आलेल्या या पदयात्रेच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचल्या. ज्या ठिकाणी ही पदयात्रा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरु झाली. 30 सप्टेंबर रोजी ही यात्रा कर्नाटक येथे पोहोचली.
काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी काँग्रेस नेते आणि आपले चिरंजीव खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षनेत्यांच्या सहवासात चालताना दिसल्या. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी बेगूर गावातील भीमनाकोल्ली मंदिरात जाऊन 5 ऑक्टोबर रोजी प्रार्थना केली. (हेही वाचा, ‘भारत जोडो’ यात्रेच्या धसक्याने BJP ला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण'- Atul Londhe)
कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षासाठी आणि भारतीय जनतेसाठी रस्त्यावर उतरुन चालणे ही मोठी अभिमनाची गोष्ट आहे. डी. के. शिवकुमार पुढे म्हणाले की, विजयादशमीनंतर कर्नाटकात विजय येईल. सोनिया गांधी कर्नाटकच्या रस्त्यावर फिरायला आल्या याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही राज्यात सत्तेवर येत आहोत, आणि भाजप आपली दुकानदारी बंद करण्याच्या मार्गावर आहे, असेही डी.के. शिवकुमार म्हणाले.
#WATCH | Karnataka: Congress interim president Sonia Gandhi joins Congress MP Rahul Gandhi and other party leaders and workers during 'Bharat Jodo Yatra' in Mandya district pic.twitter.com/iSXNW8zciV
— ANI (@ANI) October 6, 2022
भारत जोडो पदयात्रा प्रतिदिन 25 किलोमीटरचे अंतरकापत आहे. या यात्रेचा उद्देश पाच महिन्यांत तब्बल 12 राज्ये चालत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. उत्तरेकडे जाण्यापूर्वी ही यात्रा 21 दिवस कर्नाटकात असेल.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या फुटीरतावादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी आणि देशातील जनतेला आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय केंद्रीकरणाच्या धोक्यांबद्दल जागृत करण्यासाठी 'भारत जोडो यात्रा' आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा काँग्रेसचा मनसुबा असल्याचे म्हटले आहे.