खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो यात्रे'ने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजपा व आरएसएसला घ्यावी लागत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात, सर्व धर्माच्या पंडितांकडून प्रार्थना करण्यात आली. भारत जोडो यात्रेची धास्ती घेतल्यानेच भाजपाला सर्व धर्मसमभावाची आठवण झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात अतुल लोंढे पुढे म्हणाले की, जोधपूर येथील सरकारी कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. त्यांच्यासमोरच पंडितजींच्या मंत्रोच्चाराबरोबरच, मौलवी, शिख व ईसाईंच्या प्रतिनिधींकडूनही प्रार्थना करून घेण्यात आल्या. सातत्याने हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढून आपले राजकीय उदिष्ट साध्य करणाऱ्या भाजपाला मौलवींची आठवण व्हावी, त्याच कार्यक्रमात शिख, खिश्चन धर्मातील प्रतिनिधींनाही बोलावणे हा काही योगायोग नक्कीच नाही.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेवरही ‘भारत जोडो’ यात्रेचे सावट पडलेले दिसते. यासाठी खेलेगा भारत, जुडेगा भारत, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा बदल चांगलाच आहे, पण भारत जोडो यात्रेने भाजपाला द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवण्यास भाग पाडले आहे हे मात्र स्पष्ट दिसत आहे. भारत जोडो यात्रेचा उद्देशच भारताची विविधतेतील एकता अबाधित ठेवणे आहे, त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (हेही वाचा: Bharat Jodo Yatra: मुंबई कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची गैरहजेरी)
राहुल गांधी यांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण इतर धर्माच्या विरोधात नाही हे दाखवावे लागत आहे. सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमाम इलिसासी यांची भेट घेऊन आले हे काही असेच घडलेले नाही, हा बदल भारत जोडो यात्रेचे मोठे यश आहे. भारत जोडो यात्रेने आता 500 किमीचे अंतर पार केले आहे, अजून 3 हजार किमीचे अंतर पार करायचे आहे. ही यात्रा जसजशी पुढे जात राहिल तसतसे अजून बदल पहायला मिळतील. भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलून, 2024 च्या निवडणुकीत हुकूमशाही व अहंकारी सत्ताधाऱ्यांचा पराभव व लोकशाहीचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.