Hathras Gangrape Case: राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 5 जणांना हाथरसला जाण्यास परवानगी, उत्तर प्रदेश सरकारचे प्रशासन एक पाऊल मागे
Rahul Gandhi | (Photo Credits-Facebook)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांच्यासह 5 जणांना हथरस येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास अखेर परवानगी मिळाली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील हाथरस येथील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape Case) प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल गांधी हाथरसला निघाले होते. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रस्त्यातच आडवत अटक केली. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा हथरसला जाण्यासाठी आज दिल्लीहून रवाना झाले. त्यानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना हाथरसला जाण्यास मान्यता दिल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यास जाणाऱ्या पाचही जणांना कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका विचारात घेता योग्य ती काळजी आणि नियमांचे पालन करावे लागणर आहे. राहुल गांधी हाथरसला पोहोचण्यासाठी दिल्लीहून निघाले तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते जमले होते. मात्र, प्रशासनाने परवानगी दिल्याने संघर्ष टळला आहे. (हेही वाचा, उत्तर प्रदेशातील सरकारने काहीच केले नाही तर मीडियाला तेथे जाण्यास का रोखले जातेय)

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हाथरसला जाण्यासाठी प्रियंका गांधी स्वत: आपली कार चालवत होत्या. तसेच राहुल गांधी हे स्वत: त्यांच्या सोबत होते. त्यांच्या कारच्या पाठिमागे वाहनांचा प्रचंड मोठा ताफा होता. प्रियंका गांधी हाथरसला येत आहेत हे समजताच उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसी बंदोबस्त वाढवला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून 'कोणत्याही परिस्थीतीत आपण हाथरसला जाणारच अशी भूमीका व्यक्त केली होती. तसेच, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटम्यापासून जगातील कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही', असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.