Rahul Gandhi on Fuel Rate in India: जनतेचा खिसा खाली करुन केंद्र सरकार मित्रांचा खजीना भरत आहे- राहुल गांधी
Rahul Gandhi | (Photo Credits-Facebook)

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरुन (Fuel Rate in India) काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील जनतेचा खिसा रिकामा करुन केंद्र सरकार त्यांच्या मित्रांचा खजीना भरत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरतेवेळी जेव्हा आपली नजर जेव्हा वेगाने धावणाऱ्या मिटरवर पडते तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा. कच्चा तेलाचे दर मात्र अजिबात वाढले नाहीत. पेट्रोल 100 रुपये लीटर झाले आहे. परंतू केंद्र सरकारचे त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष नाही. केंद्र सरकार सर्वसामान्यांचा खिसा खाली करुन त्यांच्या मित्राची तिजोरी भरण्याचे महानक कार्य मोफत करत असल्याचा टोलाही गांधी यांनी लगावला आहे. (हेही वाचा, Shiv Sena on Fuel Rate in India: हेच का 'अच्छे दिन'? वाढत्या इंधन दरावरुन शिवसेनेने झळकावले पोस्टर, केंद्र सरकारवर निशाणा)

दरम्यान, राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांच्या बहिणीचे पती म्हणजेच रॉबर्ट वधेरा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. रॉबर्ट वाड्रा हे सोमवारी सायकल चालवत आपल्या कार्यालयात पोहोचले. वाड्रा यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एसी कारमधून बाहेर आले पाहिजे. जेणेकरुन लोकांच्या समस्या त्यांना कळतील. परंतू, असे न करता हे सरकार केवळ आगोदरच्या सरकारवर आरोप करत सुटले आहे.

दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने दराचा शतकी आकडा गाठला आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल तबबल 100 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. वाढत्या इंधन दरावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.