आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) आणि सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru) यांच्यावर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात (Kaziranga National Park) रात्री सफारी केल्याचा आरोप आहे. सोनेश्वर नारा आणि प्रबीन पेगू या कार्यकर्त्यांनी हिमंता बिस्वा सरमा आणि सद्गुरू यांनी वन्यजीव संरक्षण कायदा मोडल्याची तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, सरमा आणि वासुदेव यांनी सूर्यास्तानंतर जीप सफारी केली, जी वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आहे.
ठराविक वेळेनंतर राष्ट्रीय उद्यानात सफारी करता येत नाही, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 चा हवाला दिला आहे. काझीरंगा नॅशनल पार्क, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, हे एक शिंगे गेंड्यांचे घर आहे. घडल्या प्रकाराबाबत निर्माण झालेल्या गदारोळानंतर, सीएम सरमा यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले.
सरमा म्हणाले- वन्यजीव कायद्यानुसार वॉर्डन रात्रीच्या वेळीही संरक्षित क्षेत्रात जाण्याची परवानगी देऊ शकतो. कोणताही कायदा लोकांना रात्रीच्या वेळी आत जाण्यास प्रतिबंध करत नाही. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे या सिझनसाठी औपचारिक उद्घाटन झाले आणि आता सद्गुरु आणि श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे लाखो अनुयायी असल्याने, यावेळी आम्हाला आशा आहे की काझीरंगासाठी पर्यटन सिझन खूप चांगला असेल.
यासह सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना सरकारने आमंत्रित केले होते. आमचा विश्वास आहे की या विशेष प्रसंगासाठी सरकारने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या.
आसामचे मुख्य वनसंरक्षक एमके यादव यांनी सांगितले की, वन विभागाने सद्गुरू आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. त्यामुळे सद्गुरू आणि मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा उद्यानात प्रवेश केला असे म्हणणे चुकीचे आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती. केवळ रात्र आहे म्हणून त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याचे काही कारण नव्हते. (हेही वाचा: शाळांमध्ये भजन, सूर्यनमस्कारावर बंदी घालण्याची मागणी; Majlis-e-Ulema ची राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला विनंती)
गोलाघाट जिल्हा पोलिसांत तक्रार दाखल करणारे कार्यकर्ते सोनेश्वर नारा आणि प्रबीन पेगू यांनी सांगितले की, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सीएम सरमा आणि सद्गुरू यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळी 4 नंतर सफारीला परवानगी नाही, मात्र या दोघांनी संध्याकाळी 6 नंतरही सफारीचा आनंद लुटला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, परंतु त्यांनी तपास सुरू केला आहे.