LPG Price Hike

तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) आपल्या इंधन दरात नुकतीच दुरुस्ती केली. ज्यामुळे एलपीजी सिलेंडर दर (Commercial LPG Cylinder Prices) वाढले आहेत. ही नवी दरवाढ आज, म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Rates) किंमतीत 48.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,691.50 रुपयांवरून 1,740 रुपये झाली आहे. मुंबई शहरातही या किमती बदलल्या आहेत. 19 किलोच्या सिलिंडर व्यतिरिक्त 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नुकताच श्रावण संपला आहे. गणोशोत्सवाचाही सांगता झाली आहे. त्यामुळे सणउत्सवांचा काळ सुरु झाला आहे. आशा काळात झालेली ही दरवाढ नागरिक आणि व्यावसायिकांसाठी महागाई खिशावरील भार वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे.

दरवाढीचा फटका कोणाला?

एलपीजी सिलेंडर दरवाढ ही खास करुन रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांसारख्या क्षेत्रांवर परिणाम करणारी ठरेल. व्यावसायिक आस्थापना स्वयंपाक आणि इतर कामांसाठी या सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्याच्या परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे अन्न आणि हॉटेल उद्योगातील ग्राहकांसाठी किंमती वाढू शकतात. ज्याचा फटका सामान्यांना बसू शकतो. दरम्यान, व्यावसायिक दरवाढ होऊनही घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर अपरिवर्तित राहिल्याने घरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकासाठी घरगुती एलपीजीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. (हेही वाचा, LPG Gas Cylinder Price 1 January 2024: दिलासादायक! नवीन वर्षात गॅस सिलेंडर झाला स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत)

देशभरातील प्रमुख शहरांतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दर

  • मुंबई:1,692 रुपये
  • दिल्ली: 1,740 रुपये
  • कोलकाता: 1,850 रुपये
  • चेन्नई: 1,903 रुपये

मागील किंमतीतील बदल

दरम्यान, यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांची कपात केली होती. नवीन दर आता देशभरात लागू झाले आहेत, ज्यामुळे एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर आर्थिक बोजा वाढला आहे. परिणामी, वाढीचा विविध उद्योगांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे संभाव्यतः ग्राहकांसाठी जास्त खर्च होऊ शकतो.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलल्या नाहीत

सुदैवाने, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल न करता ही दरवाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरवर लागू होते. याचा अर्थ घरगुती स्वयंपाकाचा खर्च स्थिर आहे, परंतु व्यावसायिक एलपीजीच्या किमती वाढल्याने जेवणासाठी जास्त खर्च होऊ शकतो. असे असले तरीही वाढत्या इंधन दरांचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो.