
कोफोर्ज लिमिटेडचे शेअर्स (Coforge Share Price) बुधवारी (5 फेब्रुवारी) चांगलाच वधारला. भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये या कंपनीचा शेअर दणक्यात 9.9% वाधारला. ज्यामुळे त्याची प्रति समभाग किंमत 7,924 रुपयांवर पोहोचली. पुढच्या काहीच क्षणामध्ये या समभागास अप्पर सर्किट लागले. हे वृत्त लिहीत असताना हा स्टॉक 770.75 रुपयांनी म्हणजेच तब्बल 10.69% नी वाढून 7,983.15 रुपयांवर ट्रेंड करत होता. दरम्यान, सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा, सकाळी 9.26 वाजता, कोफोर्जचे शेअर्स 7.16% वाढून 7,720 प्रति शेअरवर व्यवहार करत होते, तर बीएसई सेन्सेक्स 0.32% घसरून 73,225.26 वर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवल आता 51,607.31 कोटी रुपये झाले आहे. कोफोर्जच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 10,017.95 आणि नीचांकी 4,291.05 रुपये प्रति शेअर होता. सांगितले जात आहे की, हा समभाग विभाजीत होणार असल्याने गुंतवणुकदारांनी कंपनीवर विश्वास दाखवत खरेदीचा सपाटा लावला आहे.
कोफोर्ज शेअर्स वधारण्याचे नेमके कारण काय?
कंपनीच्या संचालक मंडळाने केलेल्या घोषणेनुसार, कंपनी समभागाचे विभाजन होणार आहे. हे समभाग विभागजन 1.5 या पटीत असणार आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात या शेअर्सचे दर्शनी मुल्य 10 रुपयांवरुन 2 रुपये इतके होणार आहे. त्यामुळे विभाजनानंतर कोफोर्जकडे मागील 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सऐवजी 2 रुपयांचे 33.43 कोटी इतके इक्विटी शेअर्स असतील. कंपनीच्या दाखल्यानुसार, स्टॉक स्प्लिटचा उद्देश तरलता सुधारणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे हा आहे, ज्यामुळे शेअर्स अधिक परवडणारे बनतील. विभाजनाची रेकॉर्ड तारीख लवकरच जाहीर केली जाईल. दरम्यान, मार्केटमध्ये कंपनीची प्रतिमा चांगली असल्याने अनेक गुंतवणुकदार या समभागांना प्राधान्य देऊ पाहतात. मात्र, समभागाची बाजारातील किंमत पाहता सामान्य गुंतवणुकदारांसाठी ती आवाक्याबाहेरची असते. सबब, आता विभाजनानंतर समभागांची किंमत सामान्यांच्या आटोक्यात येऊ शकते. परिणामी गुंतवणुकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याचे समजते. समभाग वधारण्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
कोफोर्जबाबतच्या प्रमुख घडामडी
- कोफोर्जने रिथमॉस इंक. आणि टीएमएलॅब्स प्रा. लि. विकत घेतले
- स्टॉक स्प्लिटसोबतच, कोफोर्जने त्याच्या उपकंपन्यांद्वारे धोरणात्मक अधिग्रहणांची घोषणा केली:
- रिथमॉस इंक. अधिग्रहण: कोफोर्ज इंक. रिथमॉस इंक. मधील 100% हिस्सा 30 दशलक्ष डॉलरच्या आगाऊ देयकात खरेदी करेल.
- टीएमएलॅब्स प्रा. लि. अधिग्रहण: कोफोर्ज टेक्नॉलॉजीज ऑस्ट्रेलिया प्रा. लि. २० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये टीएमएलॅब्स प्रा. लि. मधील 100% हिस्सा खरेदी करेल.
- दोन्ही व्यवहार 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
कोफोर्ज स्टॉक कामगिरी आणि बाजार
गेल्या वर्षभरात, कोफोर्जच्या शेअर्समध्ये 14% वाढ झाली आहे, जे सेन्सेक्सपेक्षा लक्षणीयरीत्या मागे आहे, जो याच कालावधीत 0.93% घसरला. विश्लेषकांना अपेक्षा आहे की स्टॉक स्प्लिट आणि अधिग्रहणांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढेल आणि आयटी सेवा फर्मसाठी दीर्घकालीन वाढ होईल.