जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांची त्यांच्या रांची येथील निवासस्थानी चौकशी करत असताना हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
माहितीनुसार, जेएमएमने एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने एससीएसटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर दिल्ली ते रांचीपर्यंत छळ केल्याचा आरोप केला आहे.
तत्पूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानी जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठ्या सुरक्षा कवचात चौकशी सुरू केली. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांची यापूर्वी 20 जानेवारी रोजी याच प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्या दिवशी चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. त्या दिवशी सोरेन यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली.
या चौकशीच्या पार्श्वभूमीवर, कलम 144 अंतर्गत राजधानीच्या मुख्य ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या 100 मीटरच्या परिघात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. सोमवारी, ईडीने हेमंत सोरेन यांच्या नवी दिल्लीतील शांती निकेतन निवासस्थानातून 36 लाख रुपये रोख, एक बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. जमीन घोटाळ्याबरोबरच याबाबतही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. (हेही वाचा: Kalpana Soren likely to CM Jharkhand: हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटकेच शक्यता, झारखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी कल्पना सोरेन यांच्या नावाची चर्चा)
दुसरीकडे, सोरेन यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या विरोधात जेएमएम समर्थकांनी जवळच्या मोरहाबादी मैदानावर आणि इतर काही ठिकाणी निदर्शने केली. एका आंदोलकाने सांगितले, 'केंद्राच्या सूचनेनुसार ईडी आमच्या मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. याला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण राज्याची आर्थिक नाकेबंदी करू.'