
Landslides In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ढगफुटी आणि भूस्खलनाच्या (Cloudburst and Landslides) घटनांनी मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त येत आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रभावित मंडी जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 29 जण अजूनही बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मंडी जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा -
मंडी जिल्ह्यातील थुनाग, कारसोग, जोगिंदरनगर आणि गौहर या आपत्तीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. थुनागमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर कारसोगमध्ये एक आणि गौहरमध्ये सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, जोगिंदरनगरमधील स्यांजमधून दोन मृतदेह सापडले आहेत. तसेच, थुनाग, कारसोग आणि गौहरमधील 29 जण बेपत्ता आहेत. (हेही वाचा - Bihar Drowning Case: गयामध्ये धबधब्यात वाहून जाणाऱ्या 6 तरूणी थोडक्यात बचावल्या; पर्यटक आले मदतीला धावून (Video))
घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -
याशिवाय, या आपत्तीमुळे मंडी जिल्ह्यात 148 घरे, 104 गोठे आणि 162 गुरांचे नुकसान झाले आहे. तसेच, आपत्तीत 14 पूलांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 154 लोकांना वाचवण्यात आले आहे. मंडी प्रशासनाने आपत्तीग्रस्त लोकांसाठी अनेक मदत शिबिरे देखील सुरू केली आहेत, ज्यामध्ये 357 लोकांनी आश्रय घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), पोलिस, गृहरक्षक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) यांच्या पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. सोमवार रात्रीपासून मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे कारसोग आणि धरमपूर उपविभागात मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, गोहर आणि सदर उपविभागात भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.