चित्रकूटच्या गाजलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी (Chitrakoot Gang Rape Case) माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती (Gayatri Prajapati) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खासदार आमदाराच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी उशिरा ही शिक्षा सुनावली. गायत्रीचे अन्य दोन साथीदार आशिष शुक्ला आणि अशोक तिवारी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिघांनाही दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने तिघांना पॉस्को कायद्याच्या कलम 376 डी आणि 5जी/6 अंतर्गत दोषी ठरवले आहे.
याच प्रकरणात आरोपी असलेल्या अमरेंद्र सिंग उर्फ पिंटू सिंग, विकास वर्मा, चंद्रपाल आणि रुपेश्वर उर्फ रुपेश यांना न्यायालयाने संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सर्व आरोपी तुरुंगात आहेत. सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, चित्रकूट येथील पीडित महिलेने 18 फेब्रुवारी 2017 रोजी लखनऊमधील गौतम पल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पिडीतेने आरोप केला होता की, सपा सरकारमध्ये खाण मंत्री असलेल्या गायत्री प्रजापतीसह सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
अहवालात म्हटले आहे की, खाणकामाचे काम देण्याच्या बहाण्याने आरोपींनी महिलेला लखनौला बोलावले. यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी बलात्कार झाला. या घटनेचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला, मात्र कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरोपींविरुद्ध अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. (हेही वाचा: Rape Case: 'शारीरिक संबंधांसाठी पूर्वी घेतलेली संमती भविष्यातील लैंगिक संबंधासाठी लागू होत नाही'; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
2014 मध्ये गायत्रीने पहिल्यांदा पिडीतेवर बलात्कार केला, त्यानंतर 2016 पर्यंत तो इतरांसोबत पीडितेचे शारीरिक शोषण करत राहिला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 8 फेब्रुवारी 2017 रोजी गायत्री प्रजापतीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी 15 मार्च 2017 रोजी प्रजापतीला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.