Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

छत्तीसगडमधून (Chhattisgarh) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. इथल्या टिकरापाराच्या ब्रिज नगर भागात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शनच्या काही तास आधी नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार मुलाने आपल्या पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली व त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या रक्तरंजित खेळात एकूण 72 वेळा चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मुलीच्या अंगावर 40 तर मुलाच्या अंगावर 32 चाकूच्या जखमा आढळल्या आहेत.

अद्याप या घटनेचे ठोस कारण समोर आलेले नाही. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत अस्लम अहमद आणि कहकशा बानो यांच्या शरीराचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. या रिपोर्टच्या आधारे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस नातेवाईकांव्यतिरिक्त घटनास्थळी उपस्थित इतर लोकांचेही जबाब घेणार आहेत. घटनेच्या वेळी खोलीत पती-पत्नीशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच अस्लम तणावात होता, मात्र त्याचे कारण अजून समोर आले नाही.

माहितीनुसार, 19 तारखेला लग्न झाल्यानंतर अस्लम 20 तारखेच्या रात्री आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात होता, मात्र नातेवाईकांनी त्याला समजावून घरी परत आणले. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. फुटेजमध्ये अस्लमचे नातेवाईक त्याला समजावताना दिसत आहेत. फुटेजमध्ये त्याला मारहाणही करण्यात आल्याचे समजते. यानंतर अस्लम घरी परत आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीची हत्या करून आत्महत्या केली. (हेही वाचा: ऑनलाइन मागवला आयफोन; पैशांअभावी केली डिलिव्हरी बॉयची हत्या; तीन दिवस मृतदेहाजवळ थांबला आरोपी)

याबाबत मुलीचा मेकअप करण्यासाठी आलेल्या ब्युटीशियनने सांगितले की, जेव्हा ती नवविवाहित वधूला रिसेप्शनसाठी रेडी करण्यासाठी तिच्या खोलीत गेली तेव्हा आत अस्लम झोपला होता. तो आजारी होता. ब्युटीशियन खोलीत आल्यानंतर तो उठला आणि त्याने ब्युटीशियनला काही वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर दरवाजा आतून बंद करण्यात आला. नंतर अस्लम आणि कहकशामध्ये वाद सुरू झाला. वाद वाढला व त्याची परिणती वरील घटनेमध्ये झाली.