कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळणार 5 लाख रुपयांची मदत
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (Covid-19) मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. आज माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत (Journalist Welfare Scheme) ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी होण्यासाठी समितीकडून JWS साप्ताहिक बैठका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे.

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 26 पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मान्यता दिली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण योजना समितीच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. (भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत 300 पत्रकारांचा मृत्यू; इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजमध्ये खुलासा)

ANI Tweet:

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारने अशा प्रकारची मदत कोविड मुळे मृत्यू झालेल्या 41 पत्रकारांच्या कुटुंबियांना केली होती. दरम्यान, समितीकडून आठवड्याला JWS बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने JWS अंतर्गत आर्थिक मदतीसाठी आलेल्या अर्जावर त्वरीत निर्णय घेता येईल. त्याचबरोबर समिती कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 11 पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदती अर्जांचा देखील विचार करत आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात अनेक पत्रकारांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकराचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.