Railway Minister Piyush Goyal

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) रेल्वेसेवा ठप्प होती. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या. तर 1 जून पासून 200 प्रवासी रेल्वे ट्रेन्सचं बुकींग सुरु करण्यात आले आहे. दरम्यान रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. संपूर्ण देशात रेल्वे तिकीट बुकींग उद्यापासून पुन्हा सुरु होणार असून त्यासाठी तब्बल 1.7 लाख सर्व्हिस सेंटर्स सज्ज आहेत. तसंच पुढील 2-3 दिवसांत रेल्वे तिकीट क्वाऊंटरवर बुकींग सुरु होईल. यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर काही दिवसांतच अजून ट्रेन्स सुरु करण्यात येतील. तसंच रेल्वे स्थानकांवरील दुकानांमध्ये पार्सल घेऊन जाण्याची सोय सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेकजण देशभरात विविध ठिकाणी अडकून पडले होते. त्यांच्यासाठी 1 जूनपासून विशेष प्रवासी ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचे तिकीट बुकींग आज सकाळी 10 पासून सुरु झाले. त्याबद्दल बोलताना रेल्वेमंत्री पियुष गोयल माहिती देताना म्हणाले, "गेल्या अडीच तासांत द्वितीय श्रेणीच्या पॅसेंजर ट्रेनसाठी 4 लाख तिकीट्स बुक झाले आहेत. अनेकांना घरी जायाचे आहे तर अनेकांना कामावर परतायचे आहे, हे नक्कीच चांगली चिन्हं आहेत." (देशात 1 जून पासून सुरु होणाऱ्या 200 प्रवासी ट्रेन्सचे तिकीट कसे बुक कराल? irctc.co.in वरुन तिकीट बुक करण्यासाठी स्टेप्स)

ANI Tweet:

स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी धावत असलेल्या श्रमिक ट्रेन्सला काही राज्यांमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. 40 लाख मजूरांना पश्चिम बंगालमधील आपल्या घरी परतायचे असून आतापर्यंत केवळ 27 गाड्याच राज्यात दाखल झाल्या आहेत, असेही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 5,609 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले असून 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,12,359 इतका झाला असून अद्याप 63624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 3435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चौथा टप्प्यातील लॉकडाऊन सुरु असून या नव्या लॉकडाऊनचे नवे स्वरुप हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे.