
भारतीय जनता पक्षाने सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी हे सर्व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसशिवाय आघाडी निर्माण करण्यासाठी केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. पुढे असे म्हटले की, काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
भाजपच्या प्रवक्त्याने असे म्हटले की, ज्यांच्याकडे देशासाठी कोणतेही उद्देष किंवा लक्ष नाही त्यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. परंतु प्रश्न असा आहे की, 2024 मध्ये भारताचा पंतप्रधान कोण असेल ममता बॅनर्जी की राहुल गांधी? असा ही टोला लगावला आहे.(Sanjay Raut: काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नाही- संजय राऊत)
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याचे भाजप नेते म्हणाले. ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देशभरात काँग्रेस शिवाय आघाडी स्थापन केली आहे. पूनावाला म्हणाले की, या बैठकीत काँग्रेसविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर ही बैठक झाली.
दरम्यान, या बैठकीमुळे भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवरील राजकीय एकजुटीच्या प्रक्रियेला वेग येईल, असे शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून रविवारी म्हटले गेले. दुसरीकडे, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी याआधी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून 'हद्दपार' करा, नाहीतर देश 'बरबाद' होईल, असे म्हटले होते. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत.