
शनिवारी भाजपचे खासदार सच्चिदानंद साक्षी महाराज (BJP MP Sakshi Maharaj) उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना तहसील येथे पोहचले होते. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन व लव्ह जिहादवर (Love Jihad) जोरदार हल्ला केला. देशाच्या इतर राज्यांप्रमाणे योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद'विरूद्धच्या कायद्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या पार्श्वभूमीवर उन्नावचे खासदार साक्षी महाराज म्हणाले की, लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींच्या बोली लावल्या जातात. ते पुढे म्हणाले, लव्ह एक चांगला शब्द आहे. पूर्वीपासून लव्ह मॅरेजची परंपरा चालत आली आहे. यामध्ये कोणाचाही आक्षेप नाही, परंतु यामध्ये जिहाद जोडला गेल्यावर ते विष बनते.
साक्षी महाराज पुढे म्हणाले की, ‘लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींना खोट्या नावाने फसवण्यात येते आणि त्यांच्यापासून दहशतवादी जन्माला घातले जातात व त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येते. लव्ह मॅरेजेस 99 टक्के यशस्वी होतात, मात्र लव्ह जिहाद 99 टक्के अपयशी ठरतात. महत्वाचे म्हणजे लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात, जिथे एका कट्टर हिंदू मुलीचा दर 11 लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी जातीच्या मुलींचे वेगवेगळे दर निश्चित केले आहेत.’ साक्षी महाराजांनी असा दावा केला की, या गोष्टी मदरसे व मशिदीद्वारे चालविल्या जातात. यादरम्यान योगी सरकारने आणलेल्या लव्ह जिहाद कायद्याची त्यांनी प्रशंसा केली. (हेही वाचा: धक्कादायक! अल्पवयीन मुलीला जिंवत जाळून एका मांत्रिकाची आत्महत्या; राजस्थानच्या बारमेर येथील घटना)
उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी लग्नासाठी बेकायदेशीर धर्म परिवर्तन विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. योगी सरकारच्या लव्ह जिहाद संबंधित धर्म परिवर्तनाच्या अध्यादेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा अध्यादेश नैतिक आणि घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर असल्याचे सांगत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच साक्षी महाराजांची शेतकरी आंदोलन आणि पोस्टर प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, पाकिस्तानच्या धर्तीवर इस्लामच्या आधारे निषेध करण्याचा मार्ग सामाजिक सुधारणेसाठी नाही. तो देशाचे विभाजन करण्यासाठी आहे. पाकिस्तानात अनेक महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत. सैन बागेतही आंदोलन झाले. त्याच धर्तीवर काही लोक या देशाचे विभाजन करण्यासाठी हे षडयंत्र करत आहेत.